झारखंडचे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, प्रभारी अविनाश पांडे यांचा दावा, ८ फेब्रुवारीला राहुल गांधींसोबत आमदारांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:11 AM2022-02-05T11:11:47+5:302022-02-05T11:12:55+5:30
Jharkhand News: मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधील काँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला.
नागपूर : मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधीलकाँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला. याचाच भाग म्हणून झारखंडमधील काँग्रेसच्या १८ आमदारांची ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर दौऱ्यादरम्यान पांडे यांनी शुक्रवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पांडे म्हणाले की, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून, यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये असलेली काँग्रेसची सरकारे पाडण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. आता तसे प्रयत्न महाराष्ट्र व झारखंडबाबत होत आहेत. झारखंडमध्ये याचा सामना करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, झारखंड सरकारही ताकदीने काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रदेश महासचिव अभिजित सपकाळ, सचिव रवींद्र दरेकर उपस्थित होते.
चार राज्यांत काँग्रेसचेच सरकार
उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांमध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस सत्तेत येईल. पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार येईल. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशातही काँग्रेस उल्लेखनीय कामगिरी करेल, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसशिवाय पर्याय नाही
काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष एकसंध व मजबूत होणे शक्य नाही. विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा कुणाचीही असू शकते; मात्र गेल्या सात वर्षात राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने भाजपला घेरले हे प्रशंसनीय आहे, असे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. प्रादेशिक नेत्यांची नावे पुढे हेतुपुरस्सर विरोधी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
झारखंडसाठी असे आहे नियोजन
nकिमान समान कार्यक्रमांतर्गत सरकार काम करेल.
nसंघटन बळकटीसाठी ६० दिवसांचा कार्यक्रम. चिंतन प्रशिक्षण शिबिर होणार.
nपक्षाचा प्रत्येक मंत्री दरमहा आठ जिल्ह्यांचा दौरा करेल.
n कार्यकर्त्यांना सन्मान देऊन पक्षविस्तार केला जाईल.