नागपूर : उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला नुकसान होईल व त्यांच्यासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी नागपुरात आले असताना प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, तसेच शेतकरी उत्पादनात हमीभाव दिला नाही. केंद्रानेदेखील कुठलीही पावले उचलली नाहीत, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची योग्य भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारी रोजीच युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्याची आवश्यकता होती. मात्र विलंब केल्यामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. उणे १० अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत असून ही निंदनीय बाब आहे, असे तोगडिया म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये का नाहीत ?
वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणात महाविद्यालये नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेरील देशांत जावे लागते. हे केंद्र शासनाचे अपयशच आहे. एकीकडे आपण विश्वगुरू बनण्याच्या गोष्टी करतो. मग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संख्येत महाविद्यालये का नाहीत? असा सवाल डॉ. तोगडिया यांनी उपस्थित केला. देशात वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग असल्याने रिक्त जागा असूनदेखील विद्यार्थी बाहेर जातात. ४५ वर्षांअगोदर मी एमबीबीएस केले तेव्हा पंधराशे रुपये वार्षिक शुल्क होते. आता विद्यार्थ्यांना ७५ लाख ते एक कोटी द्यावे लागतात. यावर केंद्राने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.