भाजपची राज्यात सावरकर गौरव यात्रा, नवीन पिढीपर्यंत इतिहास नेणार
By योगेश पांडे | Published: March 28, 2023 01:01 PM2023-03-28T13:01:08+5:302023-03-28T13:02:56+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याची माहिती
नागपूर : काँग्रेस नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असताना भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही या मुद्द्यावर जशास तसे उत्तर देऊ. भाजप राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार आहे, ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा निघणार असून पूर्व विदर्भात आ. विजय रहांगडाले व प्रवीण दटके यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली.
राहुल गांधी एक तासदेखील काळ्या पाण्याची शिक्षा भोगू शकत नाहीत. राहुल गांधी यांची सावरकर यांच्यासमोर काहीच पात्रता नाही. नाना पटोले, राहुल गांधी यांच्या डोक्यात फरक पडला आहे. कुणावर टीका करत आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही. सावरकर यांचा इतिहास पुसण्याचे काम काँग्रेस नेते करत असून आम्ही नेमका इतिहास नवीन पिढीपर्यंत घेऊन जाऊ. एक कोटी लोक यात सहभागी होणार, असेदेखील त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे नौटंकीबाज
आपली व मुलाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांचा अपमान सहन केला. राहुल गांधी सावरकर यांच्याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेऊन काँग्रेसचा हात का सोडत नाहीत ? बाळासाहेबांनी हे सहन केले नसते. उद्धव ठाकरे मिंधे का झाले? त्यांना परत मुख्यमंत्रीपद हवे आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. ते नौटंकीबाज आहे. संजय राऊत हे तर सकाळचा भोंगा आहे. अडीच वर्षात राहुल गांधी यांना जाब का विचारला नाही, असा सवाल बावनकुळे यांनी केला. जर शिवसेना ढोंगी नसेल तर ठाकरे किंवा राऊत यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारून दाखवावी, असेदेखील बावनकुळे म्हणाले.