जि.प. स्थायी समितीच्या बैठकीत वादंग : अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत असताना, जि.प. सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी उमटायला लागली आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दिसून आली. सत्तापक्षाचे सदस्य रुपराव शिंगणे यांनी शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवल्याने, सभेदरम्यान दोघांमध्ये चांगलीच तू-तू-मै-मै झाली. शेवटी सभापतीने शिंगणे यांनी शिक्षण समितीचा कारभार चालवावा, असे सांगून सभात्याग केल्याची माहिती आहे. जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिंगणे यांनी शिक्षणाच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर शिक्षण सभापतीकडून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते संतप्त होऊन, सभापती आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला. त्यामुळे सभापती व शिंगणेमध्ये चांगलीच तू-तू-मै-मै झाली. त्याचबरोबर जि.प.मधील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यावर अध्यक्षासह स्थायी समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप सर्वांचा होता. सभेत कामठी तालुक्यातील जगदंबा देवस्थान कोराडी जवळील २० हेक्टर जमिनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला शिल्पग्राम उभारण्यासाठी देण्यात यावी, यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. परंतु यास सदस्य नाना कंभाले व पद्माकर कडू यांनी विरोध केला. महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विभागातंर्गत १ ते १५ आॅगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविण्यासंदर्भात सूचना अध्यक्षांनी पशुधन अधिकाऱ्यांना केल्या. सभेला उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम, सदस्य संध्या गोतमारे, विजय देशमुख,वर्षा धोपटे, उज्वला बोढारे यांच्यासह सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, अति. सीईओ अंकुश केदार उपस्थित होते. (प्रतिनिधी) शिक्षणाधिकाऱ्याला परत पाठवा जि.प.चे प्राथमिक शिक्षण अधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागातील कामाची गती मंदावली असून, कामे तत्परतेने पार पाडली जात नाही. बरीच प्रकरणे प्रलंबित आहे. प्रलंबित प्रकरणासंदर्भात विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची ओरड सभेमध्ये सदस्यांनी केली. त्यामुळे शिक्षणाधिकारी लोखंडे यांच्याबाबत असलेल्या नाराजीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यासाठी समितीमध्ये ठराव घेण्यात आला. अध्यक्षाच्या अर्वाच्च भाषेमुळे सभागृह स्तब्ध स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण अधिकारी उपस्थित नव्हते. शिक्षण विभागाशी उपस्थित केलेल्या एका विषयावर सभेत उपस्थित उपशिक्षण अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न देता, याचे उत्तर शिक्षण अधिकारीच देऊ शकतात आणि ते बाहेर असल्याचे सांगितल्यावर अतिशय अर्वाच्च भाषेत अध्यक्षांनी अधिकाऱ्याला सुनावल्याने सभागृह स्तब्ध झाले होते. अध्यक्षांनी अशा असंसदीय भाषेचा सभेत वापर करू नये, आपल्या जीभेवर ताबा ठेवावा, असे अनेकजण खासगीत बोलून गेले.
भाजपचे शिंगणे-चव्हाण यांच्यात जुंपली
By admin | Published: August 05, 2016 3:10 AM