प्रचारासाठी विशेष पथक : इच्छुक उमेदवारांच्या संख्येत यंदा वाढ योगेश पांडे नागपूर ‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’वर जास्त भर दिला आहे. एरवी मुस्लीम मतदार पक्षापासून दूर असतात. मात्र ही मते मिळविण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. अल्पसंख्यक संपर्क समितीच्या माध्यमातून मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यात येत आहे. विशेष म्हणजे तिकिटासाठी इच्छुक मुस्लीम उमेदवारांची संख्यादेखील यंदा वाढीस लागली आहे. हिंदुत्वाचा नारा देत भाजपाने निवडणुकांच्या रिंगणात यश मिळविले. मात्र लोकसभा निवडणुकांअगोदर ‘सोशल इंजिनीअरिंग’वर भर देत मुस्लीम मतदारांची मते मिळविण्यासाठी पहिल्यांदाच गंभीरतेने विचार करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान यासाठी स्वत: पुढाकार घेतला. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्याचे प्रत्यंतर दिसून आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मुस्लीम मतदारांनी साथ दिली होती. मात्र मनपा निवडणुकांचे गणित व मुद्दे पूर्णत: वेगळे असतात. हीच बाब लक्षात ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात मुस्लीम मतदार पक्षाकडे आकर्षित व्हावेत, यासाठी अल्पसंख्यक संपर्क समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या समितीमध्ये श्रीकांत देशपांडे, भोजराज डुंबे, जमाल सिद्दीकी, फिरोज शेख यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ९४ इच्छुकांनी मागितले तिकीट मनपा निवडणुकांत मुस्लीम उमेदवारांना तिकीट देण्यासंदर्भात पक्ष सकारात्मक आहे, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून पक्षाकडे जास्त प्रमाणात मुस्लीम उमेदवारांनी तिकिटासाठी अर्ज केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९४ जणांनी अर्ज केले होते. यात २२ महिलांचादेखील समावेश आहे. बहुतांश इच्छुक हे मुस्लिमबहुल भागातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुस्लीम मतांसाठी भाजपाचे ‘सोशल इंजिनिअरिंग’
By admin | Published: January 18, 2017 2:16 AM