नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महायुतीला समर्थित पॅनल्स आघाडीवर असल्यामुळे तीनही पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय तीनही पक्षांचे असून राज्य शासनाच्या कामाला जनतेने पावती दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेत महायुती ४५ हून अधिक जागा जिंकेल तर विधानसभेत सव्वादोनशे जागा जिंकू. त्यातील एकही जागा कमी येणार नाही. राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा आम्हाला मिळतील असा दावा बावनकुळे यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणूकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातदेखील त्यांना फटका बसला आहे. महाविकासआघाडीकडे अगोदर अठराशे ग्रामपंचायती होत्या. त्या आता महायुतीकडे गेल्या आहेत. राज्यातील महायुतीच्या कामाला जनतेने दिलेली ही पावतीच आहे. महायुतीच्या कार्यकाळात थेट ग्रामपंचायतीपर्यंत पैसे पोहोचत आहेत व विकासकामे सुरू आहेत. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. भाजपची सरकार आणि संघटन ही दोन्ही चाके योग्य पद्धतीने काम करत आहे. विरोधकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेला त्यांचे सत्य लक्षात आले आहे. उद्यादेखील निवडणूक झाली तरी महायुतीचेच वर्चस्व असेल, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची बेईमानी जनतेसमोर उघड
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी किती बेईमानी केली हे जनतेला कळाले आहे. त्याचेच चित्र निकालांमध्ये दिसले आहे. विधानसभा, लोकसभा निवडणूकींत जागा वाटपावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीत कुठलीही अडचण येणार नाही. तीनही पक्षांचे नेते जे ठरवेल त्यांनाच जागा मिळेल. कुणीही उमेदवार असला तरी भाजप महायुतीतील इतर पक्षांना पूर्ण सहकार्य करू, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.