नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुस्लिम लिग हा सेक्युलर पक्ष असल्याचे वक्तव्य अमेरिकेत केले. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र, २०१२ च्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी मुस्लिम लिगच्या दोन सदस्यांचा पाठिंबा घेतला होता. आता हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.
अमेरिकेतील वॉशिंगटन येथे बोलताना राहुल गांधी यांनी मुस्लिम लीग (आययुएमएल) ही पूर्णपणे सेक्युलर पार्टी असून या पक्षात नॉन-सेक्युलर असे काहीच नाही, असे वक्तव्य केले. यावर भाजप नेते अमित मालवीय यांनी जिन्हा यांची मुस्लिम लीग धर्माच्या आधारावर भारताच्या विभाजनासाठी जबाबदार असल्याचे सांगत राहुल गांधी या पक्षाला सेक्युलर म्हणत असल्यावर आक्षेप घेतला. यावर उत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी २०१२ मध्ये नागपुरात भाजपने सत्ता स्थापनेसाठी मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतल्याची आठवण करून दिली आहे.
२०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ६२ नगरसेवक विजयी झाले होते. १४५ सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी ७३ नगरसेवकांची गरज होती. त्यावेळी भाजपने अपक्ष नगरसेवकांसह मुस्लीम लीगचे असलम खान व नाईक अंसारी या दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेत ८७ चे संख्याबळ गाठले होते. त्यामुळे नागपुरातच भाजपने मुस्लीम लीग सोबत हात मिळवणी केल्याचा इतिहास आहे. आता नागपूरचा हाच धागा धरत काँग्रेसने भाजपवर प्रतिहल्ला चढविला आहे.