लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने विविध नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. नागपूर मतदारसंघाचा प्रभार हा राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर आ.सुधाकर देशमुख यांना भाजपाचे निवडणूक प्रमुख बनविण्यात आले आहे. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे हे संयोजक तर आ.कृष्णा खोपडे हे सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहेत. विविध राजकीय पक्षांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आ.अनिल सोले यांच्याकडे देण्यात आली आहे.भाजपाच्या नेत्यांच्या मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकी सुरू होत्या. अखेर नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नेते व पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या आहेत. निवडणूक सहप्रमुख म्हणून माजी महापौर प्रवीण दटके, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी व राजेश बागडी हे काम पाहतील. तर संघटन समन्वयाची जबाबदारी भोजराज डुम्बे यांच्याकडे आहे. जाहीरनामा प्रमुख म्हणून आ.गिरीश व्यास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय संदीप जाधव (आघाडी व सेवा समन्वय), किशोर पलांदूरकर (कार्यालय विभाग समन्वयक), आशिष मुकीम (कोष समिती प्रमुख), देवेन दस्तुरे व आशिष वांदिले (प्रचारप्रमुख), चंदन गोस्वामी (माध्यम समन्वयक), संजय भेंडे (दौरा प्रमुख), दयाशंकर तिवारी (दौरा सहप्रमुख) हे काम पाहतील. सोबतच पक्षातर्फे विधानसभा क्षेत्रनिहायदेखील प्रमुख नेमण्यातआले आहेत.बावनकुळे, सावंत साधणार समन्वयदरम्यान, मागील पाच वर्षांत शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांमधील तणाव टोकाला गेला होता व कार्यकर्त्यांमध्येदेखील त्याचे प्रतिबिंब उमटले होते. आता लोकसभेसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याने समन्वय साधणे ही मोठी जबाबदारी राहणार आहे. विदर्भात दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री दीपक सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. विदर्भातील सर्वही ११ जागांवरील समन्वयाबाबत हे दोन्ही नेते लक्ष देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.