योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ता पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकारण तापले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने या कृतीचा निषेध केला व पटोलेंच्या नागपुरातील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.
नाना पटोले यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन झाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, महानगर महामंत्री राम अंबुलकर, भाजयुमो अध्यक्ष बादल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. नाना पाटोले यांनी एका गरीब ओबीसी कार्यकर्त्यांकडुन पाय धुवून घेतले. हे कृत्य करून त्यांनी दाखवून दिलं की काँग्रेस पक्ष हा फक्त हुकूमशाही गाजवणारा पक्ष आहे व त्यांच्या या वागण्यामुळे समस्त ओबीसी बांधव दुखावले गेले आहे. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी भाजयुमोकडून करण्यात आली. यावेळी आशिष मोहिते, सागर घाटोळे, सन्नी राऊत, रितेश राहटे, श्रेयस कुंभारे, नागेश साठवणे, कुलदीप माटे, गुड्डू पांडे, अक्षय ठवकर, वी एन रेड्डी, केतन साठवणे, मनमित पिल्लारे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.