मंगेश व्यवहारे, नागपूर : केंद्र सरकार मजूर, कामगार, शेतकरी व सामान्य जनतेच्या विरोधात राबवित असलेल्या धोरणाचा निषेध म्हणून मंगळवारी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) तर्फे काळा दिवस पाळण्यात आला.
आयटकचे राज्य सचिव श्याम काळे, सीटूचे व्ही.व्ही. आसाई, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अशोक दगडे, अ.भा. किसान सभेचे अरुण वनकर, शेतकरी नेते अरुण लाटकर यांनी संविधान चौकात सरकारच्या धोरणावर कटाक्ष साधत, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत सरकारला धडा शिकविण्याचा आवाहन केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ काळा दिवसाचे बॅनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी सरकारी विभागात कंत्राटी भरतीचे आदेश मागे घ्या, महागाई नियंत्रणात आणा, जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीतून वगळा, गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, किमान मासिक वेतन २६ हजार रुपये करा, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांच्या संदर्भात ज्योती अंडरसहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.