शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची संपूर्ण धूळ शेतातील उभ्या पिकांवर जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखली जाणारी कपाशी पूर्णता काळवंडली आहे. सोयाबीन, मिरची, चणा आदी पिकांचीही या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे हा शेतमाल बाजारपेठेत घेणार कोण? अपेक्षित भाव मिळणार का? असा प्रश्न शेतक ऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.गत चार महिन्यांपासून या राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता दोन कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आली असून यातील मालेवाडा ते चिमूरपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट ‘एसएमएस’ कंपनीला मिळाले आहे. दरम्यान चौपदरीकरणाच्या कामादरम्यान प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांवर बसत आहे.त्यामुळे शेतातील पिके काळवंडली असून त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेली कपाशी आता हातात येण्याच्या मार्गावर असताना या कपाशीवर सुध्दा जणू काळे ‘ढग’ साचले आहे. सोयाबीन, मिरची, चणा व इतर पिकांची सुध्दा या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे.रस्त्याचे चौपदरीकरण महत्त्वाचे व अत्यावश्यक असले तरी कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील शंभरावर शेतकऱ्यांची शेते व त्यातील उभी पिके गुणवत्ताहीन झाली आहेत. रसरातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके संकटात आली आहे. बाजारपेठेत या शेतक ऱ्यांचा शेतमाल कोण घेणार? त्यांना चांगला भाव मिळण्याची आशाही धूसर झाली आहे.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सहभागात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते यांनी काल (दि.२३) कंत्राटदार कंपनीला निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली. शिवाय कंपनीला कानपिचक्या देत येत्या १५ दिवसात नुकसानभरपाई न मिळाल्यास चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा सेना स्टाईल इशाराही निंबार्ते यांनी दिला. यावेळी सरपंच प्रमोद लांजेवार, किशोर सयाम, गणेश फुलबांधे यांच्यासह पीडित शेतकरी संजय चांभारे, शंकर ढगे, रमेश वैद्य, निखील सवाई, तुकाराम सवाई, मनोज चौहान, राजू आवारी आदी उखळी, सालेभट्टी (चोर) या गावातील शेतकरी उपस्थित होते.
ते चालतात फुंकून..याबाबत कंत्राटदार कंपनीचे अभियंता बागडे यांच्याशी संपर्क साधत चौपदरीकरणाचा कालावधी, निधी, निर्मितीचे अंतराबाबत सदर प्रतिनिधीने माहिती विचारली असता याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे बागडे यांनी सांगितले. शिवाय दररोज कोणी ना कोणी येतात माहिती विचारतात... त्यामुळे ‘मी फुंकून चालतो’ असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा नंबरसुद्धा आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. या ‘फुंकून चालण्या’मुळे तर उभ्या पिकांवर धूळ साचली नाही ना? असा हास्यास्पद प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.