सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढताच दहशतीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, गेल्या तीन दिवसापासून शहरात ‘एन-९५’ मास्कचा तुटवडा पडला आहे. याचा फायदा काही कंपन्या व औषध विक्रेत्यांनी घेणे सुरू केल्याने मास्कचा काळाबाजार सुरू झाला आहे. ‘स्टॅण्डर्ड’ कंपनीच्या मास्कची किंमत १५० रुपये असताना, सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळल्या जाणाऱ्या मास्कला ‘एन-९५’ नाव देऊन तब्बल २५० रुपयात विक्री केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, हा मास्क पॅकेटबंद अवस्थेत नाही. त्यावर कंपनीचे नाव,‘एमआरपी’ही लिहिलेले नाही.राज्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागपुरात आतापर्यंत तीन संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु त्यांचे नमुने निगेटीव्ह आल्याने मेडिकलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु सोशल मीडियामध्ये ‘कोरोना’ला घेऊन उलटसुलट लिहून येत आहे. यातच वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याने पीडित आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रतिबंधक म्हणून मास्क घालून लोक फिरत आहे. याची संख्या वाढल्याने मास्कच्या विक्रीत वाढ झाली आहे. सध्याच्या स्थितीत ‘एन-९५ मास्क’चा तुटवडा शहरात पडला आहे. ‘लोकमत’चमूने सीताबर्डी, धंतोली, मेडिकल चौक, शंकरनगर, धरमपेठ, प्रतापनगर, गांधीबाग, महाल येथील काही औषध विक्रेत्यांकडे या मास्कची मागणी केली असता त्यांनी ‘स्टॉक’ नसल्याचे सांगितले. परंतु काही दुकानांमध्ये बनावट ‘एन-९५’ मास्क सांगून त्याची विक्री होत असल्याचे आढळून आले.
‘एन-९५’ मास्कचा नावाने ग्राहकांशी खेळ‘लोकमत’चमूने दुसऱ्या एका औषध विक्रेत्याला २५० रुपये किमतीत घेतलेला मास्क दाखविल्यावर ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यानुसार, ‘एन-९५’चा प्रत्येक मास्क पॅकेटबंद येतो. तो स्टॅण्डर्ड कंपनीचा असतो. त्यावर बॅच नंबरसह किंमत लिहिलेली असते. हा मास्क ‘पीएम २.५’ कणापासून ९० ते ९५ टक्के वाचविण्यास मदत करते. मास्कवर ‘थ्री लेअर’ असते. या मास्कवर केवळ एकच ‘लेअर’ असून, तो बनावट असल्याचेही त्यांनी सांगितले.
असा सुरू आहे काळाबाजारलोकमतच्या चमूने वर्धा रोडवरील एका औषधाच्या विक्रेत्याकडे एन-९५ मास्कची मागणी केली असता त्यांनी एका साध्या कागदाच्या पॅकेटमधून १०-१२ मास्क काढून दाखवले. विशेष म्हणजे प्रत्येक मास्क पॅकेटबंद स्थितीत असणे आवश्यक असताना, विक्रेत्याने हातात मास्क घेऊन दाखवले. या मास्कवर केवळ एन-९५ इनोव्हेटिव्ह एवढेच लिहिले आहे. ज्या कागदी पॅकेटातून मास्क काढले त्या पॅकेटवर क्वान्टिटी-५० नग असे लिहिले होते. एमआरपी खोडलेली होती. एक्सपायरी डेट जानेवारी २०१५ लिहिलेली होती. औषध विक्रेत्याने या मास्कची किंमत २५० रु. सांगून बिलही दिले.