नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या युनिट २ ने रेशनच्या तांदळाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला आहे. काटोल मार्गावर अवैधरित्या तांदूळ नेणारा ट्रकच जप्त करण्यात आला आहे. त्यात ११ लाखांहून अधिक किमतीचा तांदूळ होता व पोलिसांनी ट्रकसह २१ लाखांचा माल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाला रेशनचा तांदूळ नागपुरात येत असून तो गडचिरोलीला जाणार असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी काटोल नाक्याजवळ सापळा रचला. अमरावतीचे पासिंग असलेला ट्रक येताना दिसला. पथकाने ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे ३५० क्विंटल तांदूळ होता. शेख अकील या चालकाने व अमजद खान या क्लीनरने तांदळाबाबत उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली. अमरावती येथील रशीफ नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा तांदूळ असल्याचा दावा शेखने केला. मात्र मालकाने कुठलेही दस्तावेज आणून दिले नाही. संबंधित तांदूळ काळाबाजाराचा होता व तो गडचिरोलीला अवैध विक्रीसाठी नेण्यात येत होता. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.