नागपूर : दिघोरी परिसरातील एका गोदामातून मोठ्या प्रमाणात साठवणूक केलेला सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा ८९० गोणी तांदूळ (ration rice) नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
दिघोरी परिसरातील एका गोदामात रेशनचे धान्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे आज सकाळी ४ च्यासुमारास पोलिसांनी या गोदामवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना ४४५ क्विंटल तांदळाचा साठा आढळून आला.
शासनाकडून रेशनिंगच्या दुकानात(ration shops) २ रुपये किलो दराने मिळणारा तांदूळ ८ ते १० रुपये किलोप्रमाणे खरेदी केला जातो. व पुढे हाच तांदूळ चांगल्या तांदळात मिसळून बाजारात विक्री केल्या जातो. सदर जप्त केलेला तांदूळदेखील गोंदिया जिल्ह्यात नेऊन एका राईस मिलमध्ये पॉलिश करून चांगल्या तांदळात मिसळण्यात येणार होता. पण, वेळीच पोलिसांनी छापा टाकत तांदूळ जप्त करत हा गोरखधंदा करणाऱ्यांना अटकेत घेतले आहे. रेशन धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पोलिसांच्या करवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.