ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : समाजातील गरीब व तळागाळातील नागरिकांना दाेन वेळचे जेवण मिळावे म्हणून शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे कमी किमतीत व नियमित धान्याचे वितरण केले जाते. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांची साखळी तयार करण्यात आली. काेंढाळी (ता. काटाेल) येथील स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना काही महिन्यांपासून कमी धान्याचे वाटप केले जात असून, त्यांना पावतीही दिली जात नाही. शिवाय, वजनामध्येही घाेळ केला जात असल्याचा आराेप काहींनी केला आहे. त्यामुळे उरलेले धान्य व्यापाऱ्यांना चढ्या दराने विकले जात असल्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
काटोल तालुक्यात १४२ स्वस्त धान्य दुकाने व ३८,९४० शिधापत्रिकाधारक आहेत. स्वस्त धान्यवाटपात पारदर्शकता यावी म्हणून शासनाने दुकानदारांना ई पाॅस मशीनचा व त्यावर दुकानदारांसाेबत लाभार्थ्यांच्या बाेटाचे ठसे नाेंदविण्याचा निर्णय घेतला हाेता. काेराेना संक्रमणामुळे दुकानदारांना ‘नाॅमिनी थम्ब’ची मुभा देण्यात आली असून, काही दुकानदारांनी सवलतीकडे संधी म्हणून बघितले आणि धान्याचा काळाबाजार करायला सुरुवात केली. कोंढाळी हे काटाेल तालुक्यातील सर्वांत माेठे व महत्त्वाचे गाव असून, या गावाची लाेकसंख्या २० हजारांच्या वर आहे. काेंढाळी येथील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू, तांदूळ व मका या धान्यांचा काळाबाजार केला जात असल्याचा आराेप लाभार्थ्यांनी केला आहे.
लाभार्थ्यांना प्रती १० किलाेंमागे एक किलाे धान्य कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. काेराेना संक्रमणामुळे लाभार्थी पहाटे पाच वाजल्यापासून दुकानासमाेर रांगा लावायला सुरुवात करतात. मात्र, दुकानदार धान्य वितरण व दुकानाच्या वेळेचे काेणतेही नियाेजन करीत नसल्याचेही दिसून येते. स्वस्त धान्य दुकानांतील गहू व तांदूळ काही खासगी दुकानांत विकत मिळत असल्याची तसेच गहू व तांदूळ ट्रकने नागपूरला विकायला नेला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
लाभार्थी व धान्याचे दर
काटोल तालुक्यात विधवा, दिव्यांग, निराधार, भूमिहीन, अल्पभूधारक, कुष्ठरोगी व वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांच्या आत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या सहा हजार आहे. या लाभार्थ्यांनी शासनाच्या वतीने दर महिन्याला दाेन रुपये प्रतिकिलाेप्रमाणे १५ किलाे गहू व तीन रुपये प्रतिकिलाेप्रमाणे २० किलाे तांदूळ दिले जातात. या धान्याचा पुरवठा परवानाधारक स्वस्त धान्य दुकानांतून केला जाताे. काेंढाळी येथे लाभार्थ्यांना पावती न देता व वजनात फेरफार करीत धान्यवाटप केले जात असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
....
तीन किलाे धान्य कमी
स्वस्त धान्य दुकानदारांचे स्थानिक राजकीय नेते आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची लागेबंधे असतात. त्यामुळे या दुकानदारांविरुद्ध तक्रारी केल्या तरी त्या तक्रारींकडे गांभीर्याने बघितले जात नाही. शिवाय, जुजबी चाैकशी करून प्रभावी कारवाईदेखील केली जात नाही, अशी माहिती एका सुज्ञ लाभार्थ्याने दिली. आपल्याला दुकानदाराने ३० किलाे तांदूळ माेजून दिले. ते तांदूळ घरी आणून माेजले असता, २७ किलाे भरल्याचेही त्या लाभार्थ्याने सांगितले. हा प्रकार काटाेल तालुक्यात सर्वत्र सुरू असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.