लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल. रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. देशाची अर्थव्यवस्था भक्कम होईल, असा दावा केला होता. परंतु या आत्मघातकी निर्णयामुळे बँकांसमोरील रांगेत शेकडो लोकांचे बळी गेले. रोजगार हिरावला गेला. व्यापारी, शेतकरी व मजूर अशा सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसला. भाजपा नेत्यांचा व बड्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, अशी घणाघाती टीका विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली.८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य सरकारचा निषेध म्हणून काँग्रेसने काळा दिवस पाळला. शहर काँग्रेसतर्फे टेलिफोन एक्सचेंज चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, माजी महापौर नरेश गावंडे, जयंत लुटे, युवा नेते विशाल मुत्तेमवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, अशोक बांते, रमण पैगवार, गजराज हटेवार, नितीन साठवणे, राजेश कुंभलकर आदी मान्यवर उपस्थित होते.नोटाबंदीचा निर्णय रात्री १२ वाजता जाहीर करण्यात आला. जीएसटीचाही निर्णय रात्रीलाच जाहीर करण्यात आला. नोटाबंदीत पाचशे व हजारची नोट चलनातून बाद करतानाच दोन हजाराची नोट चलनात आणून काळा पैसा पांढरा करण्याची संधी उपलब्ध केली. जीएसटी, वाढलेली महागाई, शेतीमालाला भाव नाही. बेरोजगारांना रोजगार नाही. नुसता घोषणांचा बाजार आहे. राज्यकर्त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. प्रचंड रोष असलेली जनताच ही मस्ती उतरविणार आहे, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.नोटाबंदीचा निर्णय झाल्याने आर्थिक चालना मिळेल असे वाटले परंतु असे काही घडले नाही उलट आर्थिक मंदीकडे देश वळला आहे. आज महागाई प्रचंड वाढली. शेतकरी, शेतमजूर उद्ध्वस्त झाले आहे. व्यापार मंदावला आहे, उद्योग बंद पडत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचे काम या निर्णयामुळे झाल्याचा आरोप शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला. यावेळी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. विलास मुत्तेमवार यांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अॅड. अभिजित वंजारी म्हणाले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, बंटी शेळके, रामगोविंद खोब्रागडे आदींनी सरकारच्या धोरणावर टीका केली.काळे झेडे, काळे दुपट्टे!काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात काळे दुपट्टे व हाताला काळ्या पट्ट्या बांधून तसेच काळे झेंडे उंचावून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. ‘वारे मोदी तेरा खेल , नोटबंदी हो गई फेल ’शेतीमाला भाव द्या, नोटाबंदी भारतीय काळा दिवस, मोदी सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
काळा पैसा पांढरा केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:43 AM
नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल.
ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन