लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने होणारी भात शेती शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली आहे. या निराश शेतकऱ्यांच्या जीवनात आता ‘ब्लॅक राईस’ने आशेचे किरण आणले आहे. कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’च्या (काळा तांदूळ) उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे.पारंपरिक भात पिकापासून १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या आत्मांतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा ७० एकरामध्ये राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगडमधून मागविण्यात आले. सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी १० बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. ११० दिवसात उत्पादन घेतल्या जात असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेही शक्य झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिल सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती डॉ. नलिनी भोयर यांनी दिली. ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदभार्तील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार आहे.चीन व उत्तर पूर्व राज्यात होते उत्पादनदैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदुळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वषार्पूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ‘ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे ‘फॉरबिडन राईस’ असे नाव ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. भारतामध्ये उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे.असे आहेत फायदे
- यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आहे.
- या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त अॅन्टी आॅक्सिडेंट गुणधर्म आहेत.
- यात उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटिन आहे.
सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादनकामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहायता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली.