लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांवरील सर्व ब्लॅक स्पॉट २०२१-२२ पर्यंत संपवण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी यासाठी सर्व रस्त्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अभियंता कार्यालय परिसरातील सभागृहात रस्ता सुरक्षा महिनाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरदेशमुख म्हणाले, विभागातील ब्लॅक स्पॉट निश्चित करून आवश्यकतेनुसार बदल व दुरुस्ती केली जाईल. यावेळी गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, जनआक्रोश संस्थेचे रमेश शहारे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. राजू वाघ यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ दिली. कार्यकारी अभियंता मिलिंद बांधवकर, येरखेडे, अंभोरे, भोयर, कुचेवार, जया ठाकरे, धर्मेद्र वर्मा, उपविभागीय अभियंता चंद्रशेखर गिरी, टेंभुर्णे व राजेंद्र बारई उपस्थित होते.