लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि आॅईलचे टँकर चालकांना पैशाचे आमिष दाखवून तर कधी धाक दाखवून इंधनाची चोरी करण्यास प्रवृत्त केले जाते. महामार्गावर निर्जन ठिकाणी किंवा ढाब्यावर हे इंधन उतरवून त्यात भेसळ केली जाते अन् नंतर त्याचा काळाबाजार केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा हिंगणा, बुटीबोरी, सोनेगाव, खापरी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या विविध मार्गावर सुरू आहे. या गोरखधंद्यातून रोज लाखोंची कमाई केली जाते. पोलिसांनाही त्यांचा हिस्सा मिळतो, त्यामुळे बिनबोभाट हा धंदा सुरू आहे. त्याची कुणकुण लागताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज दुपारी कारवाईसाठी सापळा लावला. आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याकडे तीन-चार ठिकाणी छापे मारले. यावेळी त्यांना इंधनाचा काळाबाजार करण्याच्या तयारीत असलेले १३ वाहनचालक आणि संशयित आरोपी आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ ट्रक तसेच दोन टँक जप्त करण्यात आले. काही जण घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणात पोलिसांनी नंतर कारवाईसाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेतले. वृत्त लिहिस्तोवर नंदनवन ठाण्यात पोलिसांची कारवाई सुरू होती. उपायुक्त भरणे यांच्या या कारवाईमुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे तसेच त्यांच्यासोबत संबंध असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
नागपुरात ज्वलनशील पदार्थाचा काळाबाजार : १३ संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:51 AM
महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांचा छापा : ८ वाहने जप्त