लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मानकापूर येथे घडली होती.विलास भागवत भुजाडे (३३) असे आरोपीचे नाव असून तो गीतानगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४४८ अंतर्गत एक महिना कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.क्रिश व निहारिका वाकोडे अशी जखमी भाऊ-बहिणीची नावे आहेत. ते त्यांच्या आई-वडिलासह गीतानगर येथील सुनंदा काथवटे यांच्या घरी भाड्याने रहात होते. ५ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरोपीने क्रिश व निहारिका यांना चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेले. दरम्यान, त्याने या चिमुकल्यांचा गळा, चेहरा, मान, हात व पायांवर धारदार ब्लेडने वार केले. चिमुकल्यांचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांची आई व सुनंदा काथवटे यांनी आरोपीच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना आरोपी हा मुलांवर ब्लेडने वार करीत असताना दिसून आला. त्यांना पाहून आरोपी घाबरला व त्याने स्वत:चा गळा ब्लेडने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यानंतर चिमुकल्यांसह आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक एल. के. हांडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. एस. ए. गौळकर यांनी कामकाज पाहिले.
चिमुकल्यांवर ब्लेडने वार करणाऱ्याला पाच वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:27 PM
दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मानकापूर येथे घडली होती.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : नागपूरच्या मानकापूरमधील संतापजनक घटना