लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लम्पी स्किन डिसीजचा ब्लास्ट झाल्यासारखी परिस्थिती आहे. या एकट्या जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात उद्भवलेल्या लम्पी स्किन डिसीजच्या साथीचा पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी बुधवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला असता ही गंभीर स्थिती पुढे आली. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी ही बैठक घेतली. यात अतिरिक्त आयुक्त आनंद फरकाडे, सहआयुक्त (मुख्यालय) डॉ. राऊतमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातील सर्व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त व जिल्हाभरातील अधिकारी सहभागी झाले होते. राज्यात मार्च महिन्यात या आजाराच्या साथीचा शिरकाव होऊनही पुरसे नियंत्रण न मिळाल्याबद्दल सचिंद्र प्रताप सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार बाधित जनावरे असल्याचा आकडा पुढे आल्यावर त्यांनी यंत्रणेची चांगलीच कानउघाडणी केली. साडेचार महिन्यांनंतरही लसीकरण योग्यपणे न झाल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत चांगलेच धारेवर धरले.लस फक्त ६.३० रुपयांचीया आजारावर दिल्या जाणाऱ्या गोट फॉक्स व्हॅक्सिन या प्रतिबंधात्मक लसीची किंमत फक्त ६.३० रुपये आहे. सर्व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांनी जिल्ह्यात आवश्यक असलेल्या लसींची नोंदणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ६५ हजार लसी मिळाल्या असून १८ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे.