नागपूर : लाडकी बहीण योजनेची विरोधकांनी चेष्टा केली. टिंगल टवाळी केली. तुम्हाला कुणी अडवलं होते. तुम्ही का नाही आणली योजना. ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका आहेत, महायुती म्हणून कमळ, धनुष्य, घडयाळ घेऊन आम्ही उभे राहणार आहोत. तुम्ही आशिर्वाद द्या. पुढे पाच वर्ष ही योजना व्यवस्थित चालविली जाईल. कुणी माईचा लाल येऊ देत ही योजना बंद पडू देणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही वचन पूर्तीचे राजकारण करकणारे आहोत. हे काम करणारे सरकार आहे. दिशाभूल करणारे नाही. १ कोटी ५९ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. ४७८८ कोटी वितरित झाले आहेत. अर्थसंकल्पात जाहीर केला तेव्हा खर्चाचा हिशेब मांडला.
काही महिला राहिल्या असतील तर एक देखील भगिनी निकष पूर्ण करणारी वंचित राहणार नाही. अर्ज करा. मंजूर करू. आता योजना लोकप्रिय झाली. मोठ्या लोकांना दीड हजाराचे महत्व काय माहीत. या रकमेतून भगिनींच्या किती कौटुंबीक गरजा पूर्ण होतील. आम्ही काम करणारे, गोर गरिबाला मदत करणारे कोण आहेत, याचा विचार करा. या योजनेत जाती पातीचा विचार केला नाही. गरिब घटकाचा विचार केला आहे. वर्षभरात तीन गॅस मोफत देण्याची योजना केली. थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे दिले. पूर्ण पारदर्शक कारभार केला.
मुलींच्या शिक्षणासाठी फी माफ केली, असेही त्यांनी सांगितले. महिला अत्याचार अक्षम्य गुन्हा आहे. दोषीला सोडणार नाही. तो किती ही मोठा असो, कुणालाही पाठिशी गालणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आम्ही देणार आहोत, असेही त्यांनी आश्वस्त केले.