लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : मांढळ ही कुही तालुक्यातील माेठी बाजारपेठ असल्याने येथे तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांची ये-जा असते. मात्र, येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचून राहात असल्याने गावात सर्वत्र डबके व चिखलाचे साम्राज्य दिसून येते. रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने खड्डे व चिखल आंधळ्या प्रशासन व लाेकप्रतिनिधींना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
मांढळची लाेकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. शाळा-महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचा तर कृषी उत्पन्न बाजार समिती, मुख्य बाजारपेठ, बॅंका व शासकीय कार्यालयांमुळे शेतकरी व इतर नागरिकांचा मांढळ येथे सतत राबता असताे. गावातील बसस्थानक चाैकापासून तर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी छाेटे-माेठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्यांना डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यांवरून चिखल तुडवित मार्गक्रमण करावे लागते.
रस्त्यांची ही अवस्था स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासाेबतच लाेकप्रतिनिधी व विविध विभागातील अधिकाऱ्यांना माहिती आहे. खड्ड्यांना वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा अधिकारी व लाेकप्रतिनिधींना निवेदने देऊन तसेच आंदाेलन करून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, कुणीही या मागणीकडे गांभीर्याने बघितले नाही. दुसरीकडे, मुरुम टाकून खड्डे बुजवावे लागतील, अशी प्रतिक्रया उपसरपंच सुखदेव जीभकाटे यांनी व्यक्त केली.
...
मनस्तापामुळे नागरिक त्रस्त
मांढळ येथील रस्त्यांवरून पायी अथवा वाहनाने जाताना चिखल तुडवावा लागताे. वाहनांच्या चाकांमुळे राेडवरील डबक्यांमधील गढूळ पाणी व चिखल अंगावर उडत असल्याने कपडे खराब हाेतात. मागील वर्षी पावसाळ्यात याच राेडवर नागरिकांनी धानाची प्रतीकात्मक राेवणी करून आंदाेलन केले हाेते. याच खड्ड्यांमधून मार्ग काढताना दुचाकीचालक राेज काेसळत असल्याने त्यांना दुखापत तर इतर नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागताे.