लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी व दलालांना फाटा देण्यासाठी घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) सुरू होताच तीन दिवसात १५० वर लोकांनी लायसन्स काढले. या लायसन्सची चाचणी परीक्षा ऑनलाईन असलीतरी कोणीही यात हस्तक्षेप करू शकत असल्याने पास होण्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे, अंध व दिव्यांगानाही लर्निंग लायसन्स मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या ‘लर्निंग लायसन्स’ काढणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी उमेदवाराला परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्वत:चा आधारकार्ड नंबर टाकल्यावर व विचारलेल्या प्रश्नांची ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यावर लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळत आहे. परंतु या योजनेत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. जुन्या योजनेत लर्निंग लायसन्स काढणाऱ्या उमेदवाराला ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेतल्यावर त्या दिवशी व दिलेल्या वेळेत आरटीओ कार्यालयात पोहचावे लागत होते. सहायक मोटार वाहन निरीक्षक मूळ कागदपत्रे पाहून उमेदवाराला आपल्या समोर चाचणी परीक्षेला बसवित होते. यामुळे परीक्षा देताना दुसऱ्यांचा हस्तक्षेप होत नव्हता. पास झाल्यावर लर्निंग लायसन्स दिले जात होते. परंतु आता उमेदवाराला कार्यालयात येण्याची गरजच पडत नाही. यामुळे उमेदवार अंध, अपंग असला तरी त्याची परीक्षा कुणीही देऊ शकतो. एवढेच नाही तर बाहेरील राज्याचा उमेदवार येथील दलालांना हाताशी धरून राज्यातील कुठल्याही आरटीओ कार्यालयाचे लर्निंग लायसन्स काढून देऊ शकतात. काही ड्रायव्हिंग स्कूलने याचे आमिष देऊन ग्राहक मिळविणेही सुरू केल्याचे चित्र आहे.
पण, परमनंट लायसन्स मिळणे कठीण
आरटीओ कार्यालयातील एका मोटार वाहन निरीक्षकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, जरी अंध किंवा दिव्यांग किंवा दुसऱ्या व्यक्तीने चाचणी परीक्षा देऊन उमेदवाराला पास केले तरी, परमनंट लायन्सच्यावेळी त्याला कार्यालयात यावेच लागणार आहे. त्यावेळी त्याचे कागदपत्र तपासले जाईल, तो अंध किंवा दिव्यांग आहे का, ते पाहिले जाईल महत्त्वाचे म्हणजे ‘टेस्ट ड्राईव्ह’मध्ये पास झाल्यावरच त्याला परमनंट लायसन्स मिळेल. परंतु तोपर्यंत तो लर्निंग लायसन्सवर रस्त्यावर वाहन चालवू शकेल.