शुभांगी भडभडे : दृष्टिबाधितांचा साहित्यवेध विषयावर एक दिवसीय संमेलननागपूर : अंध व्यक्ती केवळ दृष्टीबाबत असतात त्यामुळे त्यांच्याजवळ उणीव नसतेच. एका इंद्रियाची शक्ती दुसऱ्या इंद्रियात सामावलेली असते त्यामुळेच दृष्टिबाधितांच्या जाणिवा अतिशय समृद्ध असतात. आतापर्यंत अनेक अंधांनी समृद्ध साहित्य निर्माण केले आहे. त्यांचे साहित्य डोळसांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. भावना अभिव्यक्त करण्याचे आणि ते मांडण्याचे सामर्थ्य प्रत्येकाजवळ आहे. डोळसांपेक्षा दृष्टिबाधितांच्या अनुभवाच्या कक्षा अधिक विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे दृष्टिबाधितांनी साहित्य निर्माण करावे आणि हा समाज अधिक निकोप करण्याचा प्रयत्न करावा, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार, लेखिका शुभांगी भडभडे यांनी व्यक्त केले. द ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्यावतीने ‘दृष्टिबाधितांचा साहित्यवेध’ विषयावर एक दिवसीय संमेलन बीआरए मुंडले प्लॅटिनम सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष निखिल मुंडले, आयोजन समितीचे त्र्यंबक मोकासरे, रघुवीर कुर्मी, जयश्री पाठक, सुनंदा चापडे, आत्माराम आष्टनकर, वैशाली खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते. ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनसह गुलमोहर क्लब, उदय ट्रेडिंग कंपनी यांनी हे संमेलन आयोजन करण्यासाठी सहकार्य केले. शुभांगी भडभडे म्हणाल्या, साहित्यनिर्मितीचा आनंद वेगळा आहे. दृष्टिबाधितांनी त्यांचे अनुभव साहित्यात आणून साहित्याचे हे दालन अधिक समृद्ध करावे. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात उंची गाठण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठे व्हायचे असेल त्या क्षेत्रात काम करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुलांमधील कलांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सत्रात कविता, कथाकथन, स्वानुभव कथन सादर करून उपस्थितांची दाद घेतली. निखिल मुंडले यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांना विविध कलांत प्रोत्साहन देण्यासाठी संस्था करीत असलेले कार्य सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर त्र्यंबक मोकासरे, संस्थेचे अधीक्षक राजेश हाडके, मुख्याध्यापक नरेंद्र ताकसांडे, उच्च न्यायालयाच्या वकील नंदिनी दुबे, अरुण रणदिवे, देवराव लिचडे, पंढरी वासनिक यांच्या उपस्थितीत स्वानुभव कथन झाले. अंध असलो तरी आपण प्रगती कशी केली, यात काय अडचणी आल्या आणि त्यावर मात कशी करता आली, याचे भाष्य यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरले. समारोप ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. (प्रतिनिधी)
अंधांजवळ समृद्ध साहित्यदृष्टी असते
By admin | Published: February 25, 2016 2:45 AM