निशांत वानखेडे
नागपूर : ती जन्मापासूनच दृष्टिहीन हाेती, पण ईश्वराची देणगी म्हणून आई-वडिलांनी तिचे नाव ‘ईश्वरी’ ठेवले. आज तिनेही आई-वडिलांनी दिलेले हे नाव सार्थकी ठरविण्याकडे मार्गक्रमण केले आहे. आधी गुजरातच्या पाेरबंदरमध्ये समुद्रयश मिळविलेल्या ईश्वरीने प्रजासत्ताकदिनी नागपूरकरांनाही थक्क केले. ईश्वरीने अंबाझरी तलावात पाेहत जाऊन मधाेमध तिरंगा ध्वज फडकवीत राष्ट्रप्रेमाने सर्वांची मान उंचावली.
उत्तर अंबाझरी येथील अंध मुलांच्या शाळेत शिकणारी ईश्वरी कमलेश पांडे ही सातव्या वर्गात आहे. या चिमुकलीने आपल्या यशाची चुणूक दाखवून दिली आहे. तिने २४ मिनिटे तलावात जलतरण करीत ५०० मीटरचे अंतर पार केले. साधारण पाेहणाऱ्याला जवळपास १४ मिनिटे लागतात. मात्र तिची कामगिरीही थक्क करणारी आहे. तिथे पाेहोचल्यावर प्रशिक्षकाने तिच्या हातात तिरंगा ध्वज देत उभारलेल्या खांबावर तिने ताे फडकविला.
अंबाझरी जलसंवर्धन व संरक्षण समितीच्यावतीने दरवर्षी २६ जानेवारीला एका जलतरणपटूला तलावाच्या मधाेमध तिरंगा फडकविण्याचा सन्मान दिला जाताे. यावर्षी हा सन्मान ईश्वरीला देण्यात आला. पाेरबंदर येथील तिची कामगिरी पाहून तिची निवड करण्यात आली.
ईश्वरीचे वडील कमलेश पांडे हे जिल्हा परिषदेत सेवेला आहेत, तर आई गृहिणी आहे. ईश्वरी जन्माला आली तेव्हा तिच्या दाेन्ही डाेळ्यांचे रेटीना निकामी असल्याचे लक्षात आले. अनेक प्रकारचे उपचार झाले, पण उपयाेग झाला नाही, तेव्हा घरच्यांनी हीच देगणी म्हणून तिचा सांभाळ केला. तीन वर्षांपूर्वी वडिलांनी तिला कामगार कल्याण मंडळाच्या जलतरण तलावावर आणले. पण कुणीही तिला प्रशिक्षण द्यायला तयार हाेईना. तेव्हा संजय बाटवे यांनी जबाबदारी स्वीकारली.
बाटवे यांना यापूर्वी मतिमंद, मूकबधिर व इतर व्यंग असलेल्या मुलांना पाेहणे शिकविण्याचा अनुभव हाेता. पण दृष्टिहीन ईश्वरीला शिकविणे नवे आव्हान हाेते. ती तलावात उतरली तेव्हा दिशा कळत नसल्याने कुठेही धडकायची. तिच्या हाता-पायाला व डाेक्यालाही जखमा झाल्या. मात्र तिने आणि काेच बाटवे यांनीही संयम ढळू दिला नाही. पुलाच्या मध्ये दाेर बांधून सरळ रेषेत पाेहण्याचा सराव केला आणि आज ती माेठ्या यशाकडे वाटचाल करीत आहे. ती कुटुंबासाठी देणगी आहेच, पण अंधत्वामुळे लहानपणापासून मिळालेल्या असंख्य जखमांवर तिच्या यशाने फुंकर घातली आहे.
पाेरबंदरचा थरारक अनुभव
याचवर्षी १० जानेवारीला ईश्वरीने अभूतपूर्व कामगिरी केली. गुजरातच्या पाेरबंदर येथे समुद्रातील ५ किलाेमीटरच्या जलतरण स्पर्धेत तिने सहभाग घेतला. यावेळी तिचे आई, वडील व आजी, आजाेबा तेथे हाेते. ईश्वरी समुद्रात उतरली आणि तिने पाेहायला सुरुवात केली. दाेन तास हाेऊनही ती बाहेर आली नाही, तेव्हा आजी-आजाेबांचा संयम ढळला आणि त्यांचा प्राण कंठाशी आला. पण काेच बाटवे यांनी विश्वास दिला. अखेर ३ तास ५१ मिनिटे झाल्यानंतर ती समुद्राबाहेर आली आणि सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. आजी-आजाेबांच्या डाेळ्यात पाणी आले. ती दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली.