सेवाकार्य : चार मित्रांचा विधायक उपक्रम नागपूर : रस्त्यावर झोपलेले आणि बोचऱ्या थंडीने हुडहुडणारे जीव जिथे दिसले तिथे हे चार मित्र थांबतात...त्या निराधारांच्या अंगावर मायेचे ब्लँकेट पांघरतात अन् पुन्हा निघतात रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला झोपलेल्या वंचिताच्या दिशेने. गेल्या वर्षभरापासून या चार मित्रांचे हे सेवाकार्य अखंड सुरू आहे. डॉ. आशिष अटलोए, अमित हेडा, सुशील मौर्य, नीलेश नागोलकर अशी या चौघांची नावे आहेत. मी, माझे घर, माझे कुटुंब असा मर्यादित व व्यावहारिक विचार प्रत्येकच जण करीत असतो. परंतु ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजातही असे अनेक वंचित लोेक आहेत ज्यांना आपण मदत केली पाहिजे, याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. ते दिले जावे, कुणीतरी पुढाकार घेऊन या वंचितांच्या सेवाकार्याची प्रेरणावाट प्रकाशमान करावी, या प्रामाणिक भावनेसह या चौघांचे हे कार्य सुरू आहे. या क्रमात ते कधी अनवाणी पायाने चालणाऱ्याला चप्पल घेऊन देतात तर कधी बेघर झालेल्यांला छप्पर उभारून देतात. एखादा जीव अन्नपाण्यावाचून असेल तर लगेच त्याच्या भोजनाची व्यवस्था करतात. पण, अशा वंचितांची संख्या जास्त अन् या चौघांचे हात मर्यादित आहेत. मानवसेवेची ही साखळी आणखी विस्तारावी, यासाठी संवेदनशील समाजातून आणखी मदतीचे हात पुढे यावे, त्यांनी आमच्या या सेवाकार्यात मदत करावी, असे आवाहन डॉ. आशिष अटलोए, अमित हेडा, सुशील मौर्य, नीलेश नागोलकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ब्लँकेटदूत देताहेत मायेची ऊब
By admin | Published: November 06, 2016 2:07 AM