नागपूर : कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. मेळावे, कार्यक्रमावरही निर्बंध घातले आहे. कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे रक्तदान शिबिर किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होताच नॉनकोविडचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी, रक्ताच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये तीन ते चार दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याने रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात महिन्याकाठी साधारण ०.४८ टक्केच रक्तदान होते. यातच गेल्या आठ महिन्यापासून कोविडमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत, स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ६०, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रक्तपेढीत ४९ तर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) रक्तपेढीत ७५ बॅग उपलब्ध आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून दिवसागणिक नॉनकोविडच्या रुग्णांची संख्या वाढल्याने व नियोजित शस्त्रक्रिया होऊ लागल्याने मेडिकलला दिवसाकाठी सुमारे २५ ते ३०, मेयोला २० ते ३० तर ‘सुपर’ला १५ ते २५ बॅगची गरज पडत आहे. यामुळे आणखी दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-खासगीमध्ये जेमतेम साठा
शहरात आठ खासगी रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्येही रक्ताचा जेमतेम साठा असल्याचे येथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लाईफलाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, पुढील दोन दिवस पुरेल एवढाचा रक्तसाठा आहे. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की म्हणाले, रक्ताची बॅग देताना सिकलसेल, थॅलेसेमिया, गर्भवती व जखमी व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे, अशी बिकट स्थिती आहे. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची गरज आहे.
-महिन्याकाठी २५ हजार स्वेच्छा रक्तदात्यांची गरज
तज्ज्ञांच्या मते, कोरोनापूर्वी नागपुरात महिन्याकाठी सुमारे १२ हजार रक्तदाते स्वेच्छेने रक्तदान करायचे. परंतु आता स्वेच्छा रक्तदात्यांची संख्या जवळपास ७०० च्या खाली आली आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी किमान महिन्याकाठी २५ हजार रक्तदात्यांची आवश्यक्ता आहे.
:शासकीय रक्तपेढीतील रक्ताचा साठा
-मेयो ७५ बॅग
-मेडिकल ६० बॅग
-‘सुपर’ ४९ बॅग
- डागा ८४ बॅग