मेडिकलच्या रक्तपेढीने घडविला आदर्श : गेल्या वर्षी ११,५०० रक्तपिशव्यांचे संकलननागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर मेडिकलच्या रक्तपेढीने गेल्या वर्षी ११,५०० रक्तपिशव्यांचे संकलन करून आदर्श घालून दिला आहे. खासगी रक्तपेढ्यांच्या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी ही कामगिरी मेडिकलच्या रक्तपेढीने केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते. परंतु डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अधिष्ठातापदाचा भार सांभाळताच अनेक चांगली कामे पार पडत असल्याचे दिसून येत आहे. यात भर पडली ती आता आदर्श रक्तपेढीची. डॉ. निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाची चळवळ जोमाने राबविण्याला सुरुवात झाली. रक्तदानाची चळवळी लोकांमध्ये रु जविण्यासाठी मेडिकलच्या रक्तपेढीतील डॉक्टरसह सर्वच अधिकारी-कर्मचारी गेल्या अनेक वर्षांंपासून प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे या वर्षी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) कडून अनुदान मिळाले नाही. परिणामी नॅकोतर्फे खास रक्तदान शिबिरांसाठी वापरण्यात येणारी मोबाईल व्हॅन बंद पडली आहे. असे असलेतरी, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना, कार्यालयांना रक्तदानाचे आवाहन करून त्या प्रत्येक ठिकाणी मेडिकलची चमू पोहोचून रक्तदान शिबिर घेत आहे. यामुळे रक्तदात्यांची संख्याही वाढली. त्यामुळेच मेडिकलने मागील चार वर्षी १०-१0 हजार रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. तर या वर्षी ११,५०० हजारावर मजल गेली आहे. ही कामगिरी इतरांसाठी आदर्शवत आहे. या कामगिरीत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. वामन राऊत, डॉ. दिनकर कुंभलकर, रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पराते, समाजसेवा अधीक्षक किशोर धर्माळ यांच्यासह रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ आदींचा सिंहाचा वाटा आहे. मेडिकलच्यावतीने सिकलसेल, थालेसेमिया, बीपीएलच्या व गरजू रुग्णांना नि:शुल्क रक्ताचा पुरवठा करते. यामुळे रक्तदात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत रक्तदान करून मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही डॉ. पराते यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
सलग चार वर्षे १० हजारावर रक्तपिशव्यांचे संकलन
By admin | Published: January 09, 2016 3:35 AM