नागपूर : स्वातंत्र संग्रामसेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेला दररोज विविध संस्था, संघटना व नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. त्याच श्रुंखलेत शनिवार, १७ जुलै रोजी नागपुरात तीन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टी
बहुजन समाज पार्टी दक्षिण नागपूर, मान्यवर कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवार, १७ जुलैला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान न्यू कैलासनगर जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात युवक, विद्यार्थी, बसपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, मान्यवर कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व बसपाचे नेते उत्तम शेवडे यांनी केले आहे.
आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टीच्या वतीने कडबी चौकातील सुनीत सुबोध चौरे, प्लॉट नं. १०४, मेकोसाबाग, क्रिस्टियन कॉलनी, कडबी चौकाजवळ येथे शनिवारी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सहसचिव अशोक मिश्रा, महानगर संयोजक कविता सिंगल, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, सचिव भुषण ढाकुलकर, उत्तर नागपूर प्रभारी जितेंद्र मुरकुटे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन उत्तर नागपूरचे अध्यक्ष रोशन डोंगरे, उत्तर नागपूरचे संघटनमंत्री प्रदीप पौनीकर, उत्तर नागपूरचे सचिव गुणवंत सोमकुवर, क्लेमेंट डेव्हिड, सुनीत चौरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नाभिक एकता मंच
महाराष्ट्र नाभिक एकता मंचच्या वतीने शनिवारी सकाळी १०.३० वाजता सेंट्रल अव्हेन्यू रोडवरील दारोडकर चौकातील श्री संत नगाजी सांस्कृतिक सभागृहात भव्य रक्तदान व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी नाभिक एकता मंचचे संस्थापक सल्लागार डॉ. सुनील अतकर राहतील. उद्घाटन केसशिल्पी मंडळाचे माजी अध्यक्ष सुधीर राऊत करतील. प्रमुख पाहुणे म्हणून लकडगंजचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, पत्रकार गोपाल कडुकर, अॅड. गिरीश दादीलवार, आयकर अधिकारी रवी कुकडे, नाभिक एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष धनराज वलूकर, संस्थापक सचिव गजानन बोरकर, संस्थापक उपाध्यक्ष नरेश लक्षणे उपस्थित राहतील.
..........