लोगो-
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व.जवाहलाल दर्डा यांच्या जयंती पर्वावर २ ते १७ जुलैदरम्यान राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहीम ‘लोकमत रक्ताचं नातं’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी शहरात दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस लाइन मुख्यालय
गुरुवारी पोलीस लाइन टाकळी येथील पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन ‘लोकमत’च्या सहकार्याने करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान हे शिबिर पार पडेल. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. रक्तदान प्राणदान हे तत्त्व जोपासून रक्तदानाच्या या महत्कार्यात नागरिकांनी सहभाग द्यावा व ही मोहीम बुलंद करण्याचे आवाहन पोलीस मुख्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोठा ताजबाग दरगाह
उमरेड रोड मार्गावरील मोठा ताजबाग दरगाह परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या सहयोगाने पार पडणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन उद्योजक प्यारे खान यांच्या हस्ते होईल. राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सामाजिक भावनेच्या जबाबदारीने नागरिकांनी या रक्तसंकलन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मोठा ताजबाग दरगाह कमिटीने केले आहे.