नागपूर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे शुक्रवारी मनपा मुख्यालयात लाेकमतच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता हाेणाऱ्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापाैर दयाशंकर तिवारी, विराेधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित राहतील. हे शिबिर दुपारी ३ पर्यंत चालणार आहेत. रक्तदान प्राणदान हे तत्त्व जोपासून रक्तदानाच्या या महत्कार्यात नागरिकांनी सहभाग द्यावा व ही मोहीम बुलंद करावी, असे आवाहन मनपा मुख्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, नागपूर
जिल्हा परिषद, नागपूरच्यावतीने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद मुख्यालय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. लाेकमतच्य सहकार्याने आयाेजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्याहस्ते पार पडेल. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे विभागप्रमुख व कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित राहतील. राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सामाजिक भावनेच्या जबाबदारीने नागरिकांनी या रक्तसंकलन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
आरपीएफ
याशिवाय आरपीएफ पाेलीस विभागाच्यावतीने सकाळी १०.३० वाजता आरपीएफ पाेलीस कॅन्टीन, माेतीबाग, कडबी चाैक येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन केले जाणार आहे. रेल्वे संरक्षण दलातील जवान या माेहिमेत सहभागी हाेत असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.
नगर परिषद सावनेर
-‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय महारक्तदान मोहिमेंतर्गत शुक्रवारी सुभाष प्राथमिक शाळा सावनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत, नगर परिषद सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. याप्रसंगी उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष रेखा माेवाडे, न. प. उपाध्यक्ष ॲड. अरविंद लाेधी, प्रभारी मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित राहतील. कर्मचारी व नागरिकांनी माेठ्या संख्येने रक्तदान माेहिमेत सहभागी हाेण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.