- राहुल खराबे : रातुम नागपूर कर्मचारी प्रत्यय संस्थेचे रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्तदान अर्थात जीवनदान. तुम्ही दिलेल्या रक्ताने रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होते. तुमच्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीलाही जीवनदान मिळते आणि हा अनुभव मनाला शांती प्रदान करणारा आहे. हीच राष्ट्रीय सेवा आहे आणि यापेक्षा दुसरे मोठे महादान नसल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल खराबे यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर कर्मचारी सहकारी प्रत्यय संस्था मर्यादितच्यावतीने संस्थेच्या अमरावती रोड येथील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. यात संस्थेच्या सदस्य व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल खराबे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप मसराम, कोषाध्यक्ष सतीश पुसदकर, संचालक डॉ. वंदना खेडीकर, रामू जातोत, प्रशांत वैद्य, मनीष फुलझेले, प्रवीण गोतमारे व बाळू शेळके उपस्थित होते.
स्वेच्छेने घेतला पुढाकार
अनेक कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराची माहिती मिळताच आपल्या कामकाजातून वेळ काढत स्वेच्छेने रक्तदान केले. यात परीक्षा विभाग व एलआयटीचे कर्मचारीही मोठ्या संख्येने होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील कर्मचाऱ्यांचाही रक्तदानाबाबत उत्साह दिसून येत होता. त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यासोबतच प्रशासकीय कामासाठी आलेल्या महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले.
रक्तदानासाठी केले प्रोत्साहित
लोकमतच्या अभियानाची माहिती मिळताच संस्थेच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल खराबे यांनी परिपत्रक काढून सोसायटीच्या सर्व सदस्य व विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.
...........