सुमेध वाघमारे
नागपूर : रक्तदानानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ५७ दात्यांना एचआयव्हीची लागण असल्याचे पुढे आले. या दात्यांना उपचारांखाली आणणे गरजेचे असताना यातील ३१ दाते अद्यापही उपचारांपासून दूर आहेत. यामुळे त्यांच्याकडून पुन्हा रक्तदान झाल्यास एचआयव्ही ‘दान’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऐच्छिक व नियमित रक्तदानास प्रोत्साहन देणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर रुग्णाला दिला जाणारा रक्ताचा प्रत्येक थेंब सुरक्षित असणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच रक्तदात्याकडून रक्त घेतल्यानंतर रक्तपेढीकडून त्या रक्ताची ‘एचआयव्ही’, ‘हेपॅटायटिस बी’ व ‘सी’, गुप्तरोग व मलेरियाची तपासणी केली जाते. या सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्यावरच गरजू रुग्णांना रक्त दिले जाते.
परंतु, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागीलवर्षी रक्तदानातून उपलब्ध झालेल्या ४१ हजार ८१ रक्त पिशव्यांमधून ५७ पिशव्यांमध्ये एचआयव्ही, २२५ पिशव्यांमधून ‘हेपॅटायटिस बी’, १३३ पिशव्यांमधून ‘हेपॅटायटिस सी’, ८४ पिशव्यांमधून गुप्तरोगाचे, तर १७ पिशव्यांमधून मलेरियाचे विषाणू आढळून आले. हे सर्व रक्त नष्ट करण्यात आले असले तरी या दूषित रक्तदात्यांना उपचारांखाली आणण्याचे नियम आहे. विशेषत: आयव्हीबाधितांची नोंद ‘इंटिग्रेटेड कौन्सिलिंग सेंटर्सना’ (आयसीटीसी) करणे आवश्यक आहे. परंतु, याला कोणी गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.
- १८ मधून ९ रक्तदाते एचआयव्ही बाधित
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी शासकीयसह खासगी अशा सहा रक्तपेढ्यांमधून ५७ रक्तदात्यांच्या रक्तात एचआयव्हीचे विषाणू आल्यानंतर संबंधित रक्तपेढी व ‘डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंशन अँड कंट्रोल युनिट’ने (डीएपीसीयू) या दात्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, यातील ३१ दात्यांमधील काहींचे पत्ते, मोबाईल नंबर चुकीचे असल्याचे, तर काही प्रतिसाद देत नसल्याचे, तर काही चक्क ‘आयसीटीसी’ला नकार दिल्याचे पुढे आले. यामुळे केवळ १८ रक्तदात्यांची पुन्हा एचआयव्ही करण्यात आली. यातील नऊ दाते पॉझिटिव्ह, तर नऊ दाते निगेटिव्ह आले.
-एचआयव्ही निगेटिव्ह आलेल्या नऊ दात्यांची पुन्हा चाचणी
एचआयव्ही निगेटिव्ह आलेल्या नऊ दात्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली तरी त्यांची दीड महिने, तीन महिने, सहा महिने व बारा महिन्यांनी पुन्हा एचआयव्हीची तपासणी केली जाणार आहे.