मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष : गरीब रुग्णांसमोर आर्थिक प्रश्ननागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये भरती महिला रुग्णाच्या पतीला पैशांच्या अभावी रक्ताच्या तपासणीसाठी भटकंती करावी लागत आहे. डॉक्टर आणि कर्मचारी या महिला रुग्णाच्या गरीब पतीला त्याच्या पत्नीच्या रक्ताची थायरॉईड तपासणी मेडिकल चौकातील एका खासगी पॅथॉलॉजीतून करण्याबाबत दबाव टाकत आहेत. मेडिकलमध्ये कार्यरत सुरक्षा कर्मचारी त्यांना एका खासगी पॅथॉलॉजीचे कार्ड देऊन तेथून रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. छिंदवाड्यावरून आलेल्या या दाम्पत्याची समस्या पाहून अॅक्शन कमिटीचे सदस्य मेडिकलच्या लॅबमध्ये गेले असता त्यांना रक्ताची तपासणी करण्याची सुविधा लॅबमध्ये उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. परंतु त्यासाठी संबंधित वॉर्डच्या अटेंडंट किंवा कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रक्ताच्या नमुन्याची बॉटल लॅबमध्ये न्यावी लागते. कमिटीचे सदस्य सचिन बिसेन, मुकेश वानखेडे महिलेच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये पोहोचले. त्यांनी वॉर्डच्या नर्सपासून रक्ताचे नमुने वॉर्ड कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लॅबमध्ये पाठविण्याची विनंती केली. परंतु नर्सने डॉक्टरने सांगितल्यानंतरच कुठलेही काम करण्यात येत असल्याचे सांगून हात झटकले. या पद्धतीने आर्थिक परिस्थितीमुळे छिंदवाडावरून उपचारासाठी आलेल्या महिलेच्या रक्ताची तपासणी होऊ शकली नाही. पीडित दाम्पत्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ पैसे होते तेंव्हा त्यांनी बाहेरून महत्त्वाच्या तपासण्या केल्या. परंतु आता पैसे संपले आहेत. शुक्रवारी १८ डिसेंबरला व्यवसायाने टेलर असलेले प्रकाश नामदेव आपल्या गर्भवती पत्नीला शरीरावर सूज असल्यामुळे मेडिकलमध्ये घेऊन आले. ते डागा हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथे त्यांच्या पत्नीची स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी त्यांची समस्या पाहून त्यांना मेडिकलमध्ये भरती केले. मेडिकलमध्ये महिलेचे अबॉर्शन झाले. या दरम्यान तपासणी आणि औषधांसाठी त्यांच्या जवळचे पैसे संपले. आता वॉर्ड क्रमांक ३४ च्या डॉक्टरांनी त्यांना सॅम्पल देऊन बाहेरून तपासणी करण्यास सांगितले आहे. याबाबत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)पतीही पडला आजारीपत्नीला उपचारासाठी आणल्यानंतर रुग्णालय परिसरात मुक्काम केलेला पती प्रकाशही थंडीमुळे आजारी पडला आहे. डॉक्टरांच्या मते त्याने भोजन न केल्यामुळे त्याच्या पोटात अॅसिडीटीची समस्या निर्माण झाली. थंडीमुळे त्याची तब्येत बिघडली. त्याच्या उपचारासाठी कमिटीच्या युवकांनी पैशांची मदत केली.
बाहेरून रक्त तपासणी
By admin | Published: December 28, 2015 3:16 AM