चुलतभावाने केला खूनचंदनपार्डीतील घटना : चार आरोपींना अटक नागपूर : चुलतभावानेच चुलतभावाचा खून केल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत चंदनपार्डी येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील खुनाची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे, तिन्ही खुनांमध्ये आरोपी हे नातेवाईकच आहेत. राजू सूर्यभान चोपडे (४०, रा. चंदनपार्डी) असे मृताचे तर आरोपी सुनील धनराज चोपडे (२५), ताराचंद ऊर्फ धनराज चोपडे (२७), लक्ष्मण सूर्यभान चोपडे (६९) आणि धनराज सूर्यभान चोपडे (६०) अशी आरोपींची नावे आहेत. राजू आणि सुनील हे शेजारीच राहायचे. दोघेही चुलतभाऊ असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. राजूच्या पत्नीला पाहून सुनील हा अश्लील बोलतो, हावभाव करतो तसेच राजू हा घरी नसताना दार ठोठावणे, घराभोवती फिरतो असे त्याला माहिती पडले होते. त्यामुळे या वादात आणखी भर पडली. यातून त्यांचे वारंवार खटके उडायचे. गुरुवारी सकाळी राजू हा शेतात गेला. तेथून घराकडे परत येत असताना सुनीलने त्याला रस्त्यात अडविले आणि वाद उकरून काढला. त्यातून सुनीलसह ताराचंद, लक्ष्मण आणि धनराज यांनी राजूला काठीने मारहाण केली. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला लगेच कोंढाळी आणि मेडिकलमध्ये हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोंढाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुरेश भोयर हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भोयर हे करीत आहे. (प्रतिनिधी)...... चौकट......आठवड्यातील तिसरी घटनाजावयासह बहिणीची हत्या केल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी रात्री ९ च्या सुमारास टाकळघाट (बुटीबोरी) येथे घडली. दुहेरी हत्याकांडाला दोन दिवस होत नाही तोच बेला पोलीस ठाण्यांतर्गत सालई राणी येथे मंगळवारी साळ्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली. नातेवाईकाने खून केल्याच्या या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा अशीच एक घटना चंदनपार्डी येथे घडली. चुलतभावानेच चुलतभावाचा खून केला.
चंदनपार्डीत एकाचा खून
By admin | Published: May 03, 2014 1:23 PM