एमआयडीसीतील घटना : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : तरुणीचा गळा कापून खून करण्यात आला तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दूरवर नेत असतानाच नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे दोघांनी मृतदेह टाकून पळ काढला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजाननगरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या संदर्भात काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ते मध्यरात्री कार्तिकनगरातील विहिरीवरून पाणी भरत होते. त्यातच त्यांना दोघे जण ब्लँकेटमध्ये काहीतरी बांधून नेत असल्याचे दिसले. ते चोर असावेत, म्हणून नागरिकांनी आरडाओरड करीत त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे दोघांनी त्यांच्याकडील ब्लॅकेटमध्ये गुंडाळलेले साहित्य तिथे टाकून पळ काढला. नागरिकांनी त्याची बारकाईने पाहणी केली असता, त्या ब्लँकेटमध्ये महिलेचा मृतदेह गुंडाळलेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे लगेच एमआयडीसी पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्या तरुणीचा गळा कापून खून करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी दोघेही मृतदेह घेऊन जात होते. मृत तरुणीची ओळख पटली नसून, त्या दिशेने तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीचे वय २५ च्या आसपास आहे. पोलिसांनी कार्तिकनगरात या तरुणीबाबत विचारपूस केली. ती एका तरुणासोबत कार्तिकनगरात किरायाने राहणाऱ्या एका तरुणासोबत दोन दिवसांपूर्वी आली होती. पोलिसांनी त्या खोलीची पाहणी केली असता, खोली रक्ताने माखली असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिचा खून याच खोलीत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ती कोण व कुठली रहिवासी आहे, ती कुणासोबत, कशासाठी आली, तिचा खून का करण्यात आला आदी प्रश्न सध्या अनुत्तरित असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तरुणीचा निर्घृण खून
By admin | Published: May 13, 2017 2:42 AM