लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा संकटामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये प्लान्ट लोट फॅक्टरमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. यातूनच वीज उत्पादन जवळपास अर्धे झाले आहे. १०,२१२ मेगावॅटची क्षमता असूनदेखील उत्पादन ५,१५३ पर्यंत घटले आहे. यामुळे ५०० मेगावॅट वीज पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरात विकत घ्यावी लागत आहे.
महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्प संकटाचा सामना करत आहेत. दररोज त्यांचे उत्पादन घटत असून मंगळवारी सायंकाळी हा आकडा ५,१५३ मेगावॅट इतका होता. भुसावळचे युनिट ३, चंद्रपूरचे युनिट ४, नाशिक व पारस येथील युनिट ४ कोळशाच्या कमतरतेमुळे ठप्प झाले आहेत. महाजेनकोच्या अधिकाऱ्यांनी कोळसा खाणीचा दौरा करून अहवाल तयार केला. पावसामुळे कोळसा उत्खननात समस्या येत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. पाऊस थांबल्यानंतरच स्थिती नियंत्रणात येऊ शकेल. दुसरीकडे महावितरणचा ताण वाढला आहे. नवरात्रासोबतच सणांचे दिवस सुरू झाल्यावर विजेची मागणी वाढेल. शिवाय ऑक्टोबर हिटचादेखील सामना करायचा असल्याने विजेचा जास्त वापर होईल. त्यामुळे उत्पादन वाढले नाही तर पुढील आठवड्यापर्यंत वीजसंकट वाढेल.
आयात कोळशाचे दर वाढल्याने समस्या
देशात कोळसा संकट असताना आयात करण्यात येणाऱ्या कोळशाचे दर प्रति टन १० डॉलर्सने वाढले आहेत. महाजेनकोचे औष्णिक वीज प्रकल्प आयात कोळशाचा वापर करीत नसले तरी खासगी प्रकल्पात त्यांचा पुरवठा होत आहे. अशास्थितीत खासगी प्रकल्प वीजदर वाढविण्याबाबत विचार करीत आहेत.