नागपूर : एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सेंट्रल एव्हेन्यूच्या सेवासदन चौकात वर्धमान को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम आहे. अज्ञात आरोपींनी १७ आणि १८ ऑगस्टला एटीएममध्ये क्लोन केलेल्या कार्डचा वापर करून दीड लाख रुपये काढले. सर्व एटीएम कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते. संबंधित ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला याची माहिती मिळाली. त्यांनी वर्धमान बँकेला याची माहिती दिली. तपास केल्यानंतर १७ ऑगस्टला नऊ आणि १८ ऑगस्टला आठवेळा पैसे काढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्धमान बँकेचे व्यवस्थापक मनीष नंदकिशोर मेहता यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोन आरोपींचा हात असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात एटीएम कार्ड क्लोन करून पैसे उडविण्याच्या घटनात वाढ झाली आहे. एटीएम कार्डमध्ये चीप असते. त्यात बँक खातेधारकाचा डाटा असतो. अनेक नागरिक एटीएमचा लहान-मोठी रक्कम देण्यासाठी वापर करतात. सायबर गुन्हेगार स्वॅप मशीनमध्ये कार्ड रीडर लावून चीपमधील डाटा मिळवितात. त्याआधारे दुसरे एटीएम कार्ड तयार करून पैसे उडवितात. नुकत्याच घडलेल्या घटनेत या तंत्राचा वापर केल्याची शंका आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, त्याआधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
...............