नागपूर : सांभाळून कार चालविण्याचा सल्ला दिल्यामुळे संतप्त झालेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाने एका युवकाला जखमी केले. ही घटना शांतिनगर ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी बीएमडब्ल्यूच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
शांतिनगर कॉलनीतील रहिवासी प्रकाश हुंदनानी ९ मार्चला रात्री ११ वाजता आपल्या घरासमोर बसले होते. त्यावेळी सिल्व्हर रंगाच्या बीएमडब्ल्यू कारचा चालक बेजबाबदारपणे कार चालवून धुमाकूळ घालत जात होता. दाट लोकवस्ती असल्यामुळे प्रकाशला नागरिक बीएमडब्ल्यूमुळे अपघातग्रस्त होण्याची शंका आली. त्यांनी आपल्या मित्रासोबत अॅक्टिव्हावर कारचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी बीएमडब्ल्यू चालकास थांबविले. प्रकाशने बीएमडब्ल्यू चालकास कार सांभाळून चालविण्याचा सल्ला दिला. त्यांचा हात कारच्या खिडकीवर होता. हे पाहून बीएमडब्ल्यू चालकाने खिडकीचा काच बंद केला. त्यामुळे प्रकाशचे बोट काचात अडकले. त्यानंतर कार वेगाने पुढे नेली. बोट काचात अडकल्यामुळे प्रकाश काही अंतर घासत गेले. त्यांच्या डोक्यावर व पायावर गंभीर जखम झाली. प्रकाशने शांतिनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांच्या मते, परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. वाहन चालक नागरिकांची पर्वा न करता वाहन चालवितात. कार मुंबई पासिंगची आहे. परिसरातील सीसीटीव्हीत कारचा क्रमांक ५०५८ असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत. शांतिनगर परिसरातील नागरिक असामाजिक तत्त्वांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी पोलिसांना वेळोवेळी तक्रारही केली आहे.
...............