लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा घेणे अनिवार्य आहे. पण नागपुरातील सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज म्हणून मराठी आणि संस्कृत अशी कम्पोझिट निवड केली होती. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण उपसंचालकांनी मान्यताही दिली होती. पण राज्य शिक्षण मंडळाच्या नियमात कम्पोझिट लँग्वेज बसत नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी परीक्षेला मुकणार होते. पण विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने विशेष बाब म्हणून राज्य शिक्षण मंडळाकडून कम्पोझिट लँग्वेजचा पेपर देण्याची परवानगी मिळवून दिली. त्यामुळे ४९ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याची माहिती आहे.ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या गडबडीमुळे विद्यार्थ्यांचे पालक निराश झाले होते. नियमानुसार राज्य शिक्षण मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरी भाषा म्हणून मराठीची निवड करणे गरजेचे आहे. पण शाळेने मराठी आणि संस्कृत अशा कम्पोझिट भाषेचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकाकडे पाठविला होता आणि शिक्षण उपसंचालकांनी त्याला मान्यताही दिली होती. परीक्षेचा अर्ज भरताना सुद्धा मराठी आणि संस्कृत असा कम्पोझिट विषय टाकण्यात आला होता. कम्पोझिट विषय बोर्डाच्या नियमात बसत नसल्याने बोर्डाने ओळखपत्रात संस्कृतला गाळून मराठी विषय कायम ठेवला होता. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले होते. वर्ष वाया जाईल याची भीती पालकांना वाटत होती. त्यामुळे शाळेने नागपूर विभागीय मंडळाकडे धाव घेतली. मंडळाने विशेष बाब म्हणून राज्य शिक्षण मंडळाकडे परवानगीसाठी मागणी केली. राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिल्यानंतर कम्पोझिट विषयाचे पेपर विद्यार्थ्यांना देण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ५० गुणांचा मराठी व ५० गुणांचा संस्कृत असा पेपर सोडवावा लागणार आहे. चुकीची मान्यता दिल्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना खुलासा मागितला असल्याची माहिती आहे.