नागपूर : निर्बंध हटल्यानंतर सर्वच बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. दुकानदारांसह नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे पालन करीत काहीच दुकानदारांनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’चे बोर्ड दुकानाबाहेर लावले आहेत. अनेक दुकानदार नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रतिनिधीने महाल आणि इतवारी मुख्य बाजारपेठांची पाहणी केली असता सर्वत्र ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. काहीच दुकानाबाहेर नो मास्क, नो एन्ट्रीचे बोर्ड लटकत होते. रेडिमेड गारमेंट दुकानांबाहेर सर्वाधिक गर्दी दिसून आली. दुकानात प्रवेश करताच काऊंटरवर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. शिवाय सेल्समनने मास्क लावले होते.
इतवारीतील दुकानदार सत्यम शिवनानी म्हणाले, कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत असून सर्वच व्यवस्था केली आहे. अनेक ग्राहक मास्क न घालताच दुकानात येतात, तेव्हा त्यांना मास्क देण्यात येतो. तसे पाहता मास्क घालण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे. लॉकडाऊननंतर अनेक दिवसांनी दुकाने सुरू झाली आहे. व्यवसाय सुरू झाल्यानंतर आर्थिक नुकसान भरून निघण्याची अपेक्षा आहे. नियमांचे उल्लंघन होईल, अशी कुणीही दुकानदार कृती करणार नाही. एका खरेदीदारासोबत पाचजण दुकानात येतात, तेव्हा अडचण होते. बाहेर थांबा, असेही म्हणता येत नाही. असे ग्राहक जेवढे लवकर खरेदी करतील, त्याकडे लक्ष देण्यात येते. आता मास्क लावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.
महाल येथील लक्ष्मी बाजारचे संचालक विक्रम हसानी म्हणाले, दुकाने सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहात असल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. ग्राहकांना लवकर खरेदी करता येईल, याची व्यवस्था केली आहे. दुकानात कोरोना अटी व नियमांचे पालन करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.
गांधीबाग होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय मदान म्हणाले, दोन महिन्यानंतर मार्केट सुरू झाल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. गांधीबाग मार्केटमधील सर्वच दुकानदार कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहे. ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. याकरिता सेल्समनला निर्देश दिले आहेत.