लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्पना नागोराव लवटे (वय ५०) आणि पद्मा लवटे (६०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या महिलांचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यांनी आत्महत्या केली नसल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही महिलांचे मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे आज, गुरुवारी शवविच्छेदन करण्यात येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगरपरिषदेचा कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी पावती टाकण्यासाठी घराच्या आवारात शिरला गेला असता त्याला आतून दुर्गंधी आली. याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. ठाणेदार विजय मालचे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लवटे यांच्या घराचे दार उघडले असता पलंगावर कल्पना लवटे व पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा लवटे या दोघीही मृतावस्थेत दिसून आल्या. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. त्यांच्या घरात खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू आढळल्या नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या महिलांच्या भगिनी बुलडाणा आणि इंदौर येथे राहतात. त्या आज, गुरुवारी कामठी येथे येतील. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अनेक दिवसांपासून घरातच होत्या
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा व कल्पना अविवाहित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोघी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करायच्या. परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेजाऱ्यांशीही फारसा संबंध नव्हता. अनेक दिवसांपासून त्या घरातच होत्या असे शेजाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या महिलांचा मृत्यू आजारापणामुळे झाला असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. या दोन्ही महिला बऱ्याच दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नव्हत्या, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.- विजय मालचे, ठाणेदार, जुनी कामठी पोलीस ठाणे