मेडिकल : विनंती करूनही मिळाली नाही शीतपेटीनागपूर : जिवंत असताना माणूस अनेक यातना भोगतो, हे सर्वश्रुत आहेच, परंतु, मृत्यूनंतरही छळ संपत नसल्याचा प्रकार शुक्रवारी मेडिकलमध्ये घडला. धक्कादायक म्हणजे, एका तरुणाचा मृतदेह उघड्यावर ठेवून मेडिकलच्या शवविच्छेदन गृहातील डॉक्टर आणि कर्मचारी निघून गेले. दुसऱ्या दिवशी मृतदेहाला दुर्गंधी सुटली. नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने हे प्रकरण समोर आले. सुभाषनगर येथील रहिवासी आकाश प्रल्हाद शेंडे या तरुणाने काही खासगी कारणामुळे आत्महत्या केली. मृतदेह अंबाझरी पोलिसांनी शवविच्छेदना करिता मेडिकलमध्ये पाठविला. डॉक्टरांनी आकाश शेंडेचे रीतसर शवविच्छेदनही केले. परंतु, खरा मानवताहीन खेळ यानंतर सुरू झाला. गुरुवारी रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यामुळे व मृत आकाशच्या घरातील एका ज्येष्ठ सदस्याची प्रकृती अचानक खालवली. याचा दाखला देत आकाशचा मृतदेह शीतपेटीत ठेवण्याचा व दुसऱ्या दिवशी घेऊन जाण्याचा मानस नातेवाईकांनी डॉक्टरांपुढे बोलून दाखविला. अनेक विनवण्या केल्या. परंतु, न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा परिचय देत मृतदेहाला शवविच्छेदनगृहाच्या बाहेर बेवारसपणे ठेवले. बाहेरून शवविच्छेदन गृहाला कुलूप लावले आणि निघूनही गेले. मृत आकाशचे संपूर्ण कुटुंब गयावया करीत फिरत होते. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी मृताचे नातेवाईक शव घेण्यास गेले असता बेवारस पडलेल्या शवाला वास सुटला होता. यामुळे नातेवाईकांच्या संतापाचा भडका उडाला.(प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना घेराव; उडवाउडवीची उत्तरे!मेडिकलने असंवेदनशीलतेचा कळस गाठल्यानंतर युवक कॉंग्रेसने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. डॉ. निसवाडे कार्यालयात नव्हते. मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे यांची भेट घेतली असता त्यांनाही ठोस उत्तर देता आले नाही. पदाधिकारी व संतापलेल्या नातेवाईकांनी मेडिकलमध्ये प्रचंड नारेबाजी केली. नातेवाईकांचा आक्रोश पाहून न्यायवैद्यकीय शास्त्रप्रमुख डॉ. मुखर्जी तेथे आले. मुखर्जींना जाब विचारला असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशी समिती स्थापनया घटनेला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले. त्यांनी चौकशी समिती नेमून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. युवक काँग्रेसने डॉ. मुखर्जी व बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शवविच्छेदन गृहातच मृतदेह बेवारस!
By admin | Published: March 05, 2016 3:08 AM