बडनेरा : अज्ञात मारेकर्यांनी एका व्यापार्याची हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकला. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत कोंडेश्वर-अंजनगाव बारी मार्गावरील चांदापूर जंगलात सोमवारी सायंकाळी ६ वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. नितीन सुधाकर हिंगासपुरे (३४) असे मृताचे नाव आहे. जुना बायपास येथील दातेराव लेआऊटजवळील नंदनवन कॉलनीतील रहिवासी नितीन हिंगासपुरे हे अविवाहित होते. त्यांचा मसाला विक्रीचा व्यावसाय होता. सोमवारी दुपारी ३ वाजता ते पायदळ घरुन निघाले. सायंकाळी ६ वाजता त्यांचा मृतदेह कोंडेश्वर-अंजनगाव बारी मार्गावरील चांदापूर जंगलात एका नाल्याजवळ चादर व ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला आढळून आला. त्यांच्या डोक्यातून व पाठीतून रक्त वाहत होते. गळ्यावर मोठे निशाण उमटले होते. याकडे तेथील वनमजुरांचे लक्ष जाताच त्यांनी याची माहिती वनरक्षक किरण पुंडलिक घडेकर यांना दिली. याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस आयुक्त सुरेश मेकला, उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी. के. गावराने , गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, बडनेराचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, सहायक पालीस निरीक्षक रवी राठोड यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मारेकर्यांनी नितीन यांच्यावर हल्ला करुन त्यांची गळा आवळून हत्या केली व पुरावा नष्ट केल्याची बाब प्रथमदर्शनी पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी नितीन यांचा मतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून याप्रकरणी अज्ञात मारेकर्यांविरुद्ध हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या भादंविच्या कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा नोंदविला आहे. नितीन त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ व तीन विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)
हिंगासपुरेनगरात पसरली शोककळा
नितीन हिंगासपुरे हे जनविकास काँगेसचे अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे यांचा पुतण्या आहे. नितीन यांच्या मृत्यूने दातेराव लेआऊटसह हिंगासपुरेनगरमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. नितीनचा चुलत भाऊ चौकशीसाठी ताब्यात ४पोलिसांनी पंचनामादरम्यान घटनास्थळावरुन नितीन यांचे दोन मोबाईल, पाकीट व सहा सीम कार्ड जप्त केले आहे. यापैकी त्यांच्या एक ा मोबाईलवर शेवटचा कॉल हा त्यांचा चुलत भाऊ श्याम हिंगासपुरे यांच्या पत्नीचा आला आहे. त्याच्या हातावरील टॅट्युमध्ये श्यामच्या पत्नीचे नाव गोंदलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी श्यामला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची एम. एच. २७ ए. सी.- ७१९१ क्रमांकाची स्वीप्ट डिझायर कार जप्त केली आहे.
मित्रांचीही चौकशी
अमोल डेंबला (एकवीरानगर ) व मनीष पोकळे (आनंद विहार कॉलनी) हे दोघे प्रॉपर्टी ब्रोकरची कामे करतात. हे दोघे नितीनचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.