काेंढाळी : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतमजुराचा मृतदेह अखेर तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी (वाघ) (ता. हिंगणा) शिवारात शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आला.
किरण गेंदूजी बोलके (४५, रा. डिगडोह-पांडे, ता. हिंगणा) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. किरण विवाहित असून, त्याची पत्नी त्याला साेडून गेल्याने तसेच मुलंबाळं नसल्याने ताे एकटाच राहायचा, शिवाय शेतमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. ताे बुधवार(दि. १९)पासून बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना दिली. त्यातच उमरी (वाघ) शिवारातील तलावात शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल सुनील बन्साेड करीत आहेत.