लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविल्याचे कळाल्याने अस्वस्थ झालेल्या एका तरुणीने प्रियकराच्या भाड्याच्या सदनिकेत गळफास लावून घेतला. गुरुवारी दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, मृत तरुणीच्या बहिणीने ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, असा आरोप केल्याने नंदनवन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.राखी दिगंबर धांडे (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची माळणी, मांगली (ता.कुही) येथील रहिवासी होती. सध्या ती खरबीतील आदर्शनगरात बेबीताई चौधरी यांच्याकडे भाड्याने राहत होती. एका फार्महाऊसवर ती काम करायची. नंदनवन पोलिसांच्या माहितीनुसार, तिचे अनिल मधुकर पेठे (वय ३६) सोबत प्रेमसंबंध होते. अनिलने उमरेड मार्गावरील चामट चक्की परिसरात असलेल्या साई ताज अपार्टमेंटमध्ये २०३ क्रमांकाची सदनिका भाड्याने घेतली आहे. अनिल आणि त्याच्या मित्रांचा वावर होता. अनेकदा तेथे राखीही जायची. काही दिवसांपूर्वी अनिलने दुसरीकडे लग्न जुळविल्याची कुणकुण राखीला लागली. त्यामुळे अनिलसोबत तिचा वाद वाढला होता. या पार्श्वभूमीवर, बुधवारी घरून गेलेली राखी रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे रात्री ९.१५ च्या सुमारास बहीण उज्ज्वलाने राखीला फोन लावला. यावेळी तिने थोड्या वेळेत येते, असे सांगितले. त्यानंतर राखीचा मोबाईल बंद झाला. गुरुवारी सकाळी उज्ज्वलाने राखीच्या मोबाईलवर पुन्हा संपर्क केला. यावेळी मोबाईलची रिंग वाजत होती. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे उज्ज्वला अस्वस्थ झाली. तिला सदनिकेची माहिती असल्याने सकाळी ११ च्या सुमारास ती तेथे पोहचली. अनिल तेथे आढळला. पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. दुपारी १ च्या सुमारास उज्ज्वला नंदनवन ठाण्यात पोहचली. तेथे ती तक्रार देत असतानाच पोलीस ठाण्यात अनिल पेठेचा फोन आला आणि त्याने राखीने आत्महत्या केल्याची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांचा ताफा सदनिकेत पोहचला. तेथे राखीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तो मेडिकलला पाठवला.दरम्यान, राखीने आत्महत्या केली नसून, तिची हत्याच केली असा आरोप उज्ज्वलाने लावला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल तातडीने देण्याची डॉक्टरांना विनंती केली. तो अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून राखीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अनिल पेठेला अटक केली. दुसरीसोबत लग्न जुळल्यानंतर अनिल राखीला टाळत होता. तिला त्रास देत होता, असे नंदनवन पोलीस सांगतात.पोलिसांच्या भूमिकेवर संशयया प्रकरणाने नंदनवन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. राखीने मृत्यूपुर्वी बॉडी लोशनने सदनिकेतील आरशावर मजकूर लिहिला. त्या आधारे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे अनिलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या सदनिकेत मृत्यूपूर्वी राखीसोबत काय झाले, तिच्यावर अत्याचार झाला का, त्यावेळी सदनिकेत कोण कोण होते, त्याबाबत पोलिसांनी माहिती देण्याचे टाळल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय घेतला जात आहे.