नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झालेल्या संघमित्रा एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव रामसेवक भूहिया (वय ३८) असून तो बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी आहे.
संघमित्रा एक्सप्रेस (बंगळूरू-दानापूर, बिहार) नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता येथील मुख्य रेल्वेस्थानकात दाखल झाली. एसएलआर कोचमधील प्रवाशांची चढण्या-उतरण्यासोबत घाई सुरू असतानाच काहींनी टॉयलेटच्या समोरही गर्दी केली. बराच वेळेपासून टॉयलेटचे दार आतमधून बंद होते. दार ठोठावून, आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांना शंका आली. त्यांनी आरपीएफ जवानांना आणि रेल्वे पोलिसांना कळविले. पोलिसांनी कसेबसे दार तोडले. आतमध्ये प्रवासी मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता त्याच्या खिशात रेल्वेचे तिकीट आणि आधारकार्ड आढळले. त्यावरून त्याचे नाव रामसेवक भूहिया असल्याचे आणि तो बिहारमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलमध्ये रवाना करण्याची तयारी करतानाच औरंगाबाद (बिहार) पोलिसांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली.
----