आॅनलाईन लोकमतनागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी भू-अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा मृतदेह रेल्वेरुळावर आढळला. मृताच्या खिशातून एक चिठ्ठी जप्त करण्यात आली. मृतदेहाची अवस्था बघता ही घटना संशयास्पद ठरली आहे. सुमेध सुरेश लोहकरे (वय ३२, रा. वाठोडा) असे मृताचे नाव आहे. तो पारशिवनी येथे भू-अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. दीड वर्षांपूर्वी त्याची पारशिवनीत बदली झाली होती. सुमेधची पत्नी अश्विनीने पोलिसांना सांगितले की, सोमवारी रात्री ९.१५ च्या सुमारास दोघांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर थोड्या वेळात येतो, असे सांगून सुमेध घराबाहेर पडला. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने नेहमीच बाहेर जावे लागत असल्याने अश्विनीने विरोध केला नाही. रात्रीचे १२ वाजले तरी तो परत आला नाही. इकडे मंगळवारी सोनेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशालीनगर झोपड़पट्टीजवळच्या रेल्वेलाईनवर सुमेधचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. बाजूला त्याची दुचाकी होती अन् त्यावर हेल्मेट ठेवून होते. पोलिसांना मृत सुमेधच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्याने मामाचा मोबाईल नंबर लिहून आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार ठरवू नये, असे म्हटले. त्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी सुमेधच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. सुमेधला अंकुशी (वय ५ वर्षे) आणि तनुजा (वय १० महिने) या दोन मुली आहे. सुमेधची पत्नी अश्विनी शासकीय सेवेत असल्याची माहिती आहे.