खापरखेडा : सकाळी फिरायला जात असल्याचे सांगून घरी परत न आलेल्या कंत्राटी कामगाराचा अखेर काेराडी मंदिर परिसरातील तलावात बुधवारी (दि. २९) दुपारी मृतदेह आढळल्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, त्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने काेराडी पाेलिसांनी मंगळवारी (दि. २९) याच तलावात त्याचा शाेध घेतला असता, ताे गवसला नव्हता.
जितेंद्र भुसारी (३५, रा. खापरखेडा, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. ताे खापरखेडा वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. ताे मंगळवारी सकाळी घराबाहेर पडला हाेता. मात्र, घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. त्याच्या चपला काेराडी मंदिर परिसरातील तलावाच्या काठी आढळून आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली हाेती. त्याअनुषंगाने काेराडी पाेलिसांनी त्याचा तलावात शाेध घेतला. मात्र, ताे गवसला नव्हता. त्यामुळे खापरखेडा पाेलीस ठाण्यात ताे बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली हाेती.
दरम्यान, कुटुंबीयांनी मनोहर दुधपचारे, रा. वारेगाव, ता. कामठी याच्या मदतीने बुधवारी सकाळी त्याचा काेराडी तलावात शाेध घ्यायला सुरुवात केली. त्याचा मृतदेह आढळून येताच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला. त्याची काेराेना टेस्ट निगेटिव्ह आल्याने मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकाकडे लग्न असल्याने जितेंद्र काही दिवसांपासून सुटीवर हाेता. ताे मंगळवारी कामावर रुजू हाेणार हाेता. त्याआधीच त्याने आत्महत्या केली. ताे विवाहित असून, त्याला मुलगा व मुलगी आहे. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.